Friday, December 5, 2014

Attar

क्षणांना अनेक विशेषणं असतात आशेचे-निराशेचे, सुखदु:खाचे, रागलोभाचे, प्रेम-द्वेषाचे.. त्या त्या क्षणावेळीचे अनुभव, तत्क्षणी निर्माण झालेल्या भावना यावरून त्या त्या क्षणाला आपण लेबल लावून टाकतो. काही क्षण पुन:पुन्हा यावेसे, तर काही पार विसरून जावेसे वाटतात. काही तर शत्रूवरही येऊ नयेसे वाटतात. काही क्षणांची लयलूट करावीशी वाटते, तर काही अगदी जपून ठेवावेसे वाटतात. अशा सुंदर क्षणांसाठी कवी प्रवीण दवणेंच्या एका कवितेत शब्द वाचला- 'अत्तरक्षण' आणि त्या शब्दाने भारावूनच गेले. मनात रुंजी घालतच राहिला तो शब्द. हा क्षण अत्तरासारखा आहे, स्प्रेसारखा नाही, डिओसारखा नाही, रूमफ्रेशनरसारखा नाही. अत्तर हे छोटय़ाशा कुपीत बंद करून ठेवायचं, तेही मखमली पेटीत, बंद कपाटात. ड्रेसिंग टेबलवर मोठय़ा बाटलीत भरून ठेवून कोणीही फसाफसा उडवून त्याचा आनंद घ्यावा असं नाहीच ते. वापरतानाही अलगद हाताने हळुवारपणे मनगटाला लावून घ्यावं, नाजूक हाताने पदरावर शिंपडावं, छोटासा बोळा कानात ठेवावा. उगाच घामाचा वास लपवण्यासाठी किंवा कोणाला तरी आकर्षित करण्यासाठी नसतंच अत्तर. बरं, अत्तराचे प्रकारही कित्ती- मोगरा, केवडा, चाफा, हिना. फक्त वासावरून आकर्षित करून घेणारे. प्रत्येकाचा आनंद वेगळा, प्रत्येकाच्या सुवासाचा पोत वेगळा; पण प्रत्येक सुवास हवाहवासा, आकर्षक. काटकसरी, पण लोभसवाणा आणि अजून एक गंमत, हा सुगंध अगदी निकटवर्तीयांनाच जाणवणारा.
असे हे अत्तरक्षण प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे असतील. ते त्याने त्याने मनाच्या मखमली पेटीत छोटुकल्या कुपीत घट्ट बंद करून ठेवावे असे असतील. कधी निराशा, कंटाळा, आठवण, उसासा दाटून आल्यावर तो तो अत्तरक्षण मोकळा केला, की अगदी क्षणभरात ती नकोशी भावना नष्ट करण्याचं सामथ्र्य या क्षणात असावं. तो क्षण असेल एखाद्या नजरानजरेचा, एखाद्या स्पर्शाचा, एखाद्या समजुतीचा, एखाद्या विचाराचा. तो क्षण मृद्गंधासारखा दुर्मीळ, कस्तुरीगंधासारखा हातात न येणारा, मोगऱ्यासारखा आल्हाददायी, केवडय़ासारखा थोडासा मादकही असू शकेल.
अत्तरक्षण कोणता याचा शोध घ्यावासा वाटला, तर स्पर्धा किंवा परीक्षेत जिंकलो तो, तरुणपणातील हवीहवीशी पहिली नजरानजर झाली तो, पहिल्यांदा स्पर्श झाला तो, प्रेमाच्या कबुलीचा अगर स्वीकाराचा क्षण, की बाळाला जन्म दिला तो, बाळाचा पहिला हुंकार ऐकला तो, बाळाने पहिलं पाऊल टाकलं तो, नोकरी लागली तो, स्वत:चं घर बांधलं तो.. असे क्षण ढोबळपणे नजरेसमोर येतील आणि यादी वाढतच जाईल; पण हे सगळं खूप ठळक आणि सार्वजनिक. खरंच मनात डोकावून पाहा बरं, खरंच पाहा. हे खरोखरीचे अत्तरक्षण आहेत, की याहून काही वेगळे अत्तरक्षण सापडतायत.. असं आश्चर्यचकित होऊ नका. यापेक्षा वेगळे खूप साधे साधे क्षणही अत्तरक्षण असू शकतात. खूप दमून आल्यावर गरमागरम आयता चहाचा कप अकल्पितपणे हातात येण्याचा क्षण, थकल्याभागल्या शरीरावर गरम पाण्याचा पहिला तांब्या ओतला जातो तो क्षण, आत्यंतिक गरज असताना कुणीसा पाठीवर प्रेमाचा, स्नेहाचा किंवा आपुलकीचा हात फिरवतो तो, आपल्याला स्वत:साठी अगदी फक्त स्वत:साठी असा मिळालेला स्वत:चा क्षण, खूप थकूनभागून आल्यावर कोणाच्या तरी नजरेत भेटीची आतुरता डोकावते तो क्षण, अनपेक्षितपणे एखाद्या गरजूला मदत करण्याची संधी देणारा, स्वत:चं ठाम मत बनलं अगर मांडता आलं असा एखादा क्षण, कार्यमग्नतेत स्वत:चंही भान विसरून जाण्याचा क्षण, स्वत:च्या छंदात मग्न झाल्यावर भवताल विसरून जाण्याचा क्षण, नको असलेलं काही नाकारण्यासाठी स्पष्ट नकार देण्याचा वा आपली चूक प्रांजळपणे कबूल करण्याचाही छोटासा क्षण, सुंदर मैत्रीचा एखादा क्षण तसेच आपल्या छोटय़ाशा कृतीमुळे समोरच्याच्या चेहऱ्यावर अनपेक्षितपणे आनंदाची लकेर पसरवणारा क्षण, कोणी तरी अनपेक्षितपणे आपलं कौतुक केलं तो क्षण.. हे आणि असे सगळे अनेक छोटेछोटे क्षण सुंदर, आल्हाददायक आणि सर्वोत्तम अत्तरक्षण नाहीत काय? कारण ते क्षण फक्त नि फक्त आपले स्वत:चे असतात, आपली स्वत:ची स्वत:लाच नवी ओळख करून देतात, जगण्याला नवं परिमाण देतात आणि पुन्हा जेव्हा आपण आपल्या नकळत ती कुपी उघडतो तेव्हा मन एवढं प्रसन्न करतात, की वर्तमानातील क्षणांना सुगंधित करून तो क्षणही मस्त, मोकळा, आनंदी बनवतात, कारण त्यांच्या अनुभवांचा दरवळ आपल्या मनात ताजा असतो. फक्त हे अत्तरक्षण ओळखण्याची, हुडकण्याची आणि जतन करण्याची वृत्ती एकदा का अंगीकारली, की ते क्षण म्हणजे आपली लाखमोलाची संपत्तीच बनून जातात.
हे क्षण काही टर्निग पॉइन्ट वगैरे नसतात; पण तरीही हे क्षण अत्यंत महत्त्वाचे असतात, कारण हे जगण्याची संजीवनी ठरतात. असे अनेक अत्तरक्षण मनाच्या मखमली कुपीत घट्ट बंद केलेच पाहिजेत आणि गरजेनुसार ती कुपी उघडून त्याचा सुवास मोकळेपणी अनुभवला पाहिजे, तरच त्यातलं माधुर्य कळेल. हे क्षण आपलं वर्तमान आनंदी, उत्साही आणि सुंदर बनवतात तेव्हा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींवरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे आपला भवतालही मोकळा, प्रसन्न होतो.

No comments:

Post a Comment