Tuesday, October 8, 2019

अनोळखी व्यक्तीशी बोलताना त्याने तुम्हाला एखादा महत्त्वाचा सल्ला दिला आहे का?

अनोळखी व्यक्तीशी बोलताना त्याने तुम्हाला एखादा महत्त्वाचा सल्ला दिला आहे का?

आमच्या ऑफिस जवळच एक छोटेसे उपहारगृह आहे, तिथे एकदा सकाळचा नाश्ता करायला गेलो होतो..१ प्लेट पोहे ऑर्डर केले तेवढ्यात समोरच्या खुर्चीत एक गृहस्थ येऊन बसले.

मी पोहे खायला सुरुवात केली, अर्धे अधिक खाऊन झाले असतील अन् फोन आला…फोन वरचे संभाषण पाचेक मिनिटं चालले तोपर्यंत पोहे थंड होऊन गेले...मग मी नाखुशिने पोहे तसेच सोडून दिले आणि चहा मागवला..वेटर ने चहा दिला आणि पोह्यांची अर्धी संपवलेली प्लेट घेऊन गेला.

समोरच्या गृहस्थांचा ही नाश्ता सुरू होता. अचानक अनपेक्षितपणे त्यांनी मला एक प्रश्न विचारला.

"माफ करा हं, पण एक सुचवू का?"

"हां, बोला".

"तुम्ही ते पोहे बांधून घेतले असते आणि बाहेर कोणा गरजवंताला दिले असते तर बरे झाले असते, हे हॉटेल वाले फेकून देतात हो".

खरे तर हा आगाऊ सल्ला होता, आणि ह्यात माझी काय चूक..सगळे लोक असेच करतात…आणि समजा ते पोहे बांधून जरी घेतले तरी कुणाला आणि कुठे शोधत बसायचे ते द्यायला..

तसे पाहिले तर त्यांचे बोलणे एका अर्थाने रास्त होते...पण मला उशीर होत होता म्हणून मी थातुर मातुर बोलून संभाषण आटोपते घेतले आणि निघालो.

त्यानंतर काही दिवसांनी राजस्थान ला जायचा योग आला. जैसलमेर चा किल्ला पाहायचे ठरले होते. सकाळी भरपूर नाश्ता करून मगच बाहेर पडू असा विचार केला. किल्ल्याच्या पायथ्याशी एक हॉटेल पाहिले आणि ४ जणांसाठी ४ प्लेट पोहे मागवले.

इथली एक प्लेट म्हणजे आपल्या दोन अडीच प्लेट्स होतील. सगळ्यांचे पोट भरून सुध्धा २ प्लेट पोहे उरले..बिल देऊन आम्ही निघालो तेंव्हा मनात विचार आला, घेऊयात पॅक करून.

मित्रांनी मला वेड्यात काढले..कुठे घेऊन फिरणार आणि आम्ही नाही खाणार ते थंड पोहे..तूच खा… तरीही मी ते सोबत घेतलेच.

जैसलमेर किल्ला पाहायला कमीत कमी २ तास लागतात, त्यात आम्ही घेतलेला गाईड एकेका महालाची अशी रसभरीत वर्णने करीत होता की तब्बल ४ तास कधी उलटून गेले कळलेच नाही.

काही वेळाने आत मन रमेना म्हणून मी एकटाच किल्ल्याच्या मागच्या दरवाजाने बाहेर आलो..इथे फारशी वर्दळ नव्हती…जवळच रावणहाथा घेऊन एक वृद्ध माणूस बसला होता. रावणहाथा हे एक राजस्थानी पारंपरिक वाद्य आहे.

डोळे खोल गेलेले, केस पिकलेले, अंगावर जीर्ण झालेली वस्त्रे पण आवाज एकदम खणखणीत. आणि ज्या लयीत "केसरीया बालम, पधारो मेरे देस" ऐकवले..कान अगदी तृप्त होऊन गेले.

थोड्या वेळाने मित्रही आले. निघताना काही पैसे बाजूला अंथरलेल्या रुमालावर गुपचूप ठेवले. तोच म्हातारबाने हाताच्या खुणेनेच काही खायला आहे का विचारले. दुपारची जेवणाची वेळ टळून गेलेली…कधी खाल्ले असेल देवास ठाऊक. हातातील पोह्यांची पिशवी त्यांच्या हातावर ठेवली, म्हाताऱ्याने दोन्ही हात हातात गच्च पकडले.. कृतज्ञता डोळ्यांतून ओसंडून वाहत होती. मला कसेतरीच झाले.

किल्ला उतरताना मनाशी निश्चय केला, पुन्हा कधी अन्न फेकायचे नाही आणि कुणाला फेकू ही द्यायचे नाही…आज प्रश्न वाचला आणि लिहावेसे वाटले..एका अनोळखी माणसाने दिलेला सल्ला..खूप काही शिकवून गेला.

Shailesh-Hinge

No comments:

Post a Comment